“ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे उन्हाळी शिबिर – ३५व्या वर्षातही उत्कृष्टतेचा सातत्यपूर्ण प्रवास”
ठाणे, दि.— ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे, ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत यंदा ३५वे उन्हाळी बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने दर्जेदार प्रशिक्षण देत या अकॅडमीने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडवले आहेत. १५० हून अधिक राज्य विजेते, ३५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि १५ शिवछत्रपती पुरस्कार विजेते ही या प्रवासाची ठळक उदाहरणे आहेत.
या शिबिरामध्ये अनुभवी प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले माजी खेळाडू आणि तज्ज्ञ कोचेस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सराव करताना तांत्रिक बाबींबरोबरच फिटनेस, कोर्टवरील हालचाली, खेळाची समज आणि स्पर्धात्मक मानसिकता यांवरही लक्ष दिले जाणार आहे. शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धती आणि उत्तम सुविधा यामुळे खेळाडूंना दर्जेदार वातावरणात सराव करण्याची संधी मिळते.
यंदा शिबिराची रचना तीन भागांत करण्यात आली आहे. १९ एप्रिल ते ९ मे २०२६ या कालावधीत बेसिक कॅम्प १, ११ मे ते ३० मे २०२६ दरम्यान बेसिक कॅम्प २, तसेच १९ एप्रिल ते ३० मे २०२६ या काळात ४० दिवसांचा अॅडव्हान्स बॅच आयोजित करण्यात आला आहे. सोमवार ते शनिवार दररोज चार तासांचे प्रशिक्षण सत्र होणार असून नवशिक्यांपासून प्रगत स्तरावरील खेळाडूंपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सराव आखण्यात आला आहे.
अॅडव्हान्स बॅच हे या शिबिराचे खास वैशिष्ट्य मानले जाते. या बॅचमधून अनेक खेळाडूंनी पुढे जाऊन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण सराव, वैयक्तिक मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक वातावरण यामुळे या बॅचमधील प्रशिक्षण खेळाडूंसाठी खूप उपयुक्त ठरते.
उन्हाळी सुट्टीचा उपयोग करून दर्जेदार प्रशिक्षण घ्यायचे असल्यास हे शिबिर चांगली संधी आहे. इच्छुकांनी सकाळी ९ ते १२ वा. आणि संध्याकाळी ६ ते ९ वा. या वेळेत प्रत्यक्ष बॅडमिंटन हॉलमध्ये संपर्क साधावा किंवा खालील क्रमांकांवर संपर्क करावा: 9004181388 / 9004039106 / 9867182548 / 9619711171 / 8369731221