प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रशांत राऊत यांचा वरचष्मा! प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्कामुळे पारडे जड
विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत हे निवडणूक लढवत असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या 25 वर्षांपासून प्रशांत राऊत हे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. ठाकूर यांचे विकासाचे व्हिजन केवळ कागदावर न ठेवता ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात राऊत यांचा मोठा वाटा आहे. रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा प्रभागात सक्षमपणे राबवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
प्रशांत राऊत यांच्या लोकप्रियतेचा मुख्य आधार म्हणजे त्यांचे कोविड संक्रमण काळातील कार्य! जेव्हा सर्व जग भीतीच्या सावटाखाली होते, तेव्हा राऊत यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांसाठी धावून जाण्याचे काम केले. विलगीकरण कक्ष उभारणे, रुग्णांना बेड मिळवून देणे, औषधांचा पुरवठा आणि गरजू कुटुंबांना रेशन वाटप अशा व्यापक कामांमुळे त्यांनी लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या कार्याची प्रचिती आज निवडणुकीच्या प्रचारात मिळत असलेल्या उदंड प्रतिसादातून येत आहे.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी दिली. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि प्रभागातील प्रश्नांची अचूक जाण यामुळे त्यांना विकासपुरुष म्हणून ओळखले जात आहे.
प्रभाग 7 मधील फेरफटका मारला असता, प्रशांत राऊत यांच्याबद्दल मतदारांमध्ये प्रचंड सकारात्मकता दिसून येते. नेहमी उपलब्ध असणारा नेता अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा त्यांना वेगळे ठरवते. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी असलेला त्यांचा थेट संवाद हीच त्यांची निवडणुकीतील सर्वात मोठी शक्ती ठरत आहे.
विकासकामे, अनुभवाची शिदोरी आणि संकटकाळात जनतेला दिलेली साथ यामुळे प्रशांत राऊत यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा विश्वास आणि जनतेचे प्रेम यांच्या जोरावर प्रशांत राऊत पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
***