■प्रेरणाभूमीच्या लढ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मैदानात मनमाड येथे १५ सप्टेंबरला होणार लक्षवेधी धरणे आंदोलन
मनमाड, दि. १३ सप्टेंबर २०२५ :- मनमाड (ता.नांदगाव, जि.नाशिक) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम उभारण्यात आले आहे. या वास्तूचे भूमिपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते ९ डिसेंबर १९४५ रोजी संपन्न झाले. तर १७ नोव्हेंबर १९५१ रोजी या वास्तूचे लोकार्पण देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रचंड जमसमुदायाच्या उपस्थितीत झाले होते.
या वास्तूला ‘प्रेरणाभूमी’ तर १७ नोव्हेंबर हा दिवस ‘प्रेरणादिन’ म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या पुढाकाराने मनमाड येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात बाबासाहेबांचे पणतू प्रा. डॉ. अक्षय आंबेडकर हे देखील सहभागी होणार आहेत. मनमाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरू होईल.
राज्याच्या विविध भागातील आंबेडकरी अनुयायी या आंदोलनाला पाठिंबा देत असून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी मनमाड येथे येणार आहेत, अशी माहिती प्रेरणाभूमी कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे तसेच लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव खात्यनाम गायक संदेश उमप हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ही लढाई स्वाभिमान, आत्मसन्मान आणि अस्मितेची असून हा निर्णायक लढा पूर्णत्वाकडे जाण्यासाठी हे आंदोलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या वास्तूच्या निर्मितीस २०२६ साली ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेली ही वास्तू आता जीर्णावस्थेत आहे. वास्तूच्या अनेक भागांची पडझड झाली असून आता ही वास्तू नामशेष होईल की काय, अशा अवस्थेत पोहोचली आहे. या वास्तूच्या उभारणीच्या पाठीमागचा हेतू आणि उद्देश समोर ठेवून ज्या कष्टप्रद प्रयासातून या वास्तूची निर्मिती झाली, त्याच उद्देशाला तडा जात आंबेडकरी अनुयायी उघड्या डोळ्याने पाहत आहे, हे चित्र क्लेशदायक आहे.
या इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन करण्यासाठी प्रेरणाभूमी विकास कृती समितीने पुढाकार घेतला असून मागील वर्षी मनमाडला १७ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करून या दिवसाला प्रेरणादिन म्हणून स्थानिक पातळीवर घोषित करण्यात आले. तर या भूमिला प्रेरणाभूमी म्हणून संबोधण्याचा जाहीर कार्यक्रम देखील घेण्यात आला होता. या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी या माध्यमातून चळवळ उभी केली जात आहे.
शासनासह या वास्तूशी संबंधित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच पुन्हा एकदा या वास्तूचा प्रेरणादायी इतिहासाचा जागर करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी एक दिवसीय लक्षवेधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रेरणाभूमी कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे.