सापे वामने रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रशासन लक्ष देईल का ? प्लॅटफॉर्मवर गवताचे साम्राज्य रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी कच्चा रस्ता

0

महाड : – निलेश पवार महाड तालुक्यातील वामने गावाजवळ सापे वामने रेल्वे स्थानक सद्या रेल्वे प्रशासनाच्या दुरावस्थेचे बळी पडले आहे. रेल्वे स्थानकावर गवताचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना सर्प दशांची भीती निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी करून देखील रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे.

कोकण रेल्वे मार्गावर महाड पासून सुमारे ११ किमी अंतरावर असलेल्या सापे वामने गावाजवळ काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक उभारले गेले आहे. या परिसरातील जवळपास २५ गावातील ग्रामस्थांनी याकरता आंदोलनात्मक भूमिका घेतली होती या संघर्षानंतर या ठिकाणी रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आले. कालांतराने सापे वामने या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग करिता या स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र नूतनीकरण केल्यापासून आजतागायत या ठिकाणी केवळ स्थानक म्हणूनच वापर होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या दोन लोकल गाड्या या ठिकाणी थांबतात. दिवा रत्नागिरी आणि सावंतवाडी दिवा या दोन गाड्या या ठिकाणी थांबत असल्याने मुंबई, पनवेल, ठाणा इत्यादी परिसरामध्ये जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होत आहे. सुरुवातीला कमी गर्दी असलेले हे स्थानक आता हळूहळू गजबजू लागले आहे. मात्र स्थानकाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे.


या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मची उंची देखील अर्धा फूट इतकीच आहे. रेल्वे रूळ आणि प्लॅटफॉर्म यांचे अंतर जवळपास समान आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेतून चढणे अगर उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे. रेल्वे थांबल्यानंतर हातातील सामान घेऊन पायऱ्या चढताना महिला वयोवृद्धांना त्रास होत आहे. हीच अवस्था उतरताना देखील होत आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिती कडून वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. सापे वामने रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. सन 2019 पासून केवळ खडी टाकून जैसे थे आहे. सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत शिवाय त्या खड्ड्यांमधून पाणी साचले असल्यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या पटरीवरून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे.

या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर ढोपराइतके गवत झालेले आहे. यामुळे गाडी उशिरा आल्यानंतर अंधारातून या गवतातूनच वाट काढत प्रवाशांना बाहेर पडावे लागत आहे. गाडी आल्यानंतर कर्मचाऱ्यांना देखील याच गवतातून हिरवा झेंडा दाखवण्यास जावे लागत आहे. यामुळे सर्प दशांची देखील भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या दोन कर्मचारी निवासस्थानांची देखील दुरावस्था झाली आहे. 2019 मध्ये मानण्यात आलेले हे कर्मचारी निवासस्थाकांचा वापर आतापर्यंत झालेला नाही.


कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने या रेल्वेस्थानकाची उंची दोन फुटाने वाढवावी, या ठिकाणी प्रवाशांना येण्या जाण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात यावा, आणि दोन एक्सप्रेस गाड्या या ठिकाणी थांबवाव्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे देखील या समितीच्या माध्यमातून पत्र पाठवण्यात आलेले होते. वामने सापे या परिसरामध्ये असलेल्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमणी आता या रेल्वे स्थानकाचा वापर करू लागले आहेत. पूर्वी असलेली कमी गर्दी आता वाढली आहे.

मात्र तरी देखील रेल्वे प्रशासनाकडून या सोयी सुविधांच्या बाबतीत आणि स्थानकाच्या देखभालीबाबत दुर्लक्ष केले जात आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी देखील उत्तम व्यवस्था नाही. प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्यात आलेल्या असल्या तरी आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उभे राहावे लागत आहे.
रेल्वे प्रशासनाला रेल्वे स्थानकाच्या देखबालीबाबत वारंवार मागणी केली आहे. या ठिकाणी वाढलेल्या गवतामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. यामुळे उड्डाणपूल तसेच फलाटाची उंची वाढवा अशा प्रकारचे मागणी केलेली असून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे – मन्सूर देशमुख, अध्यक्ष कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिती  स्थानकाच्या फलाटाची उंची वाढवावी तसेच अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे मात्र रेल्वे प्रशासन कानाडोळा करत आहे यामुळे भविष्यात आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल – प्रकाश जंगम, सचिव कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त समिती.
गावी आल्यानंतर या रेल्वे स्थानकामध्ये आम्ही गाडी पकडण्यासाठी येतो मात्र या ठिकाणी फलाटाची उंची कमी असल्याने रेल्वे चढताना हात सटकण्याची भीती असते. सगळीकडे गवत उगवले आहे त्यामुळे हे पाहिल्यानंतर दुःख होते – श्री व सौ राजेश्री राजाराम कदम, रेल्वे प्रवासी मुंबई

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech