कल्याण | आत्माराम नाटेकर, ज्येष्ठ पत्रकार :
डोंबिवलीत जागोजागी मोठमोठ्या इमारती आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवले जात आहेत. यासाठी अडथळे ठरणारी लहानमोठी झाडे तोडली जात आहेत. मुंबई -ठाण्याप्रमाणेच गगनचुंबी इमारतींचे वारे आता डोंबिवलीतही वाहू लागले आहेत.
गगनचुंबी इमारती उभारण्याची विकासकांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. अनेक जुनी झाडे जमीनदोस्त करून विकासक आपला हेतू साध्य करत आहेत. साहजिकच पर्यावरणाचे संतुलन पार कोलमडले आहे. अशातही एक आशेचा किरण दिसून येतोय, तो जुन्या डोंबिवलीतील रिझर्व्ह बँक कॉलनीत. 1964 सालच्या दरम्यान हौसिंग सोसायट्याना बँकेने कर्ज देण्यास सुरुवात केल्याने कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचे घर असावे असे वाटू लागले आणि मग जमीन खरेदी करून आपल्या हक्काचा निवारा उभा करण्यासाठी प्रभाकर मुळे, विजयसेन काळे, वैजनाथ कर्णिक, यांसह 16 जणांनी 2 एकर 39 गुंठे जागा विकत घेतली 1969 साली येथे 16 बंगले बांधून पूर्ण झाले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ क्वार्टर्स को_ऑप. सो. नं. 3 या नावाने सोसायटी नोंदणीकृत झाली आणि डोंबिवली पश्चिमेस विजयनगर परिसरात या सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
आज हीरक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या या सोसायटीने आपले गावपण आजही जपले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ क्वार्टर्सच्या पहिल्या 2 सोसायट्या ठाण्यात झाल्या आणि तिसरी ही डोंबिवली. प्रत्येक बंगल्याबाहेर सुंदर बगीचा होता. आता या 16 बंगल्यांपैकी आशीष (तात्या मोहरीर), श्रीसद्गुरूकृपा (आप्पा वैद्य), डोंगरे (किलबिल) दांडेकर, कर्णिक आणि काळे असे केवळ 6 च बंगले राहिले आहेत, इतर बंगल्यांच्या जागी देवमल्हार, सुधांशु प्रभा, दत्तकृपा, कांची, अष्टगंध, सनरे, चंद्रकिरण, निलयन, मंगलमूर्ती या बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत.
सर्व कुटुंबाना बागकामाची आवड असल्याने प्रत्येकाच्या बंगल्याबाहेर सुंदर बाग आहे.
माड, पोफळी, आंबा, फणस, पपई, जांभूळ, रामफळ, सीताफळ, जायफळ, चिकू, केळी, लिंबू ही फळझाडें तर शेवगा, कढीपत्ता दररोजच्या जेवणात वापरली जाणारी झाडे येथे दिमाखात उभी आहेत.
कडुनिंब, औदुंबर, पिंपळ, अडुळसा, बेल ही औषधी झाडे आणि कुंती, बकुळ, सुरंगी, कांचन, सोनचाफा, मोगरा, पडकुलीन, अनंत, तगर, कवठी चाफा, सफेद चाफा, लाल चाफा, प्राजक्त, जास्वंद, कृष्णकमळ या फुलझाडांनी बंगल्याचना शोभा आणली आहे. कुंतीचे झाड आता दुर्मीळ झाले आहे. रातराणीप्रमाणे याची फुले रात्री फुलतात आणि त्याचा सुगंध साऱ्या आसमंतात दरवळतो. या झाडांच्या मुळाशी बाराही महिने मुबलक पाणी असल्याने सकाळी देवपूजेसाठी सर्वांनाच फुले मिळतात.
या ठिकाणी आजही विविध प्रकारचे पक्षी येतात. त्यांचा किलबिलाट सकाळीच कानी पडतो. आता मात्र घोरपड,, मुंगुस, कासव, साप, गोगलगाय हे प्राणी दिसत नाहीत. आता येथील काही झाडे विरळ झाली आहेत. आंतरराष्ट्रीय छायाचित्रकर नयन खानोलकर हा इथे पूर्वी पक्षी -निरीक्षणासाठी आवर्जून यायचा.
या सोसायटीचे माजी अध्यक्ष वैजनाथ कर्णिक, शैलजा दांडेकर (काकू), सतीश डोंगरे, प्रभाकर मुळे, विजयसेन काळे, तात्या मोहरीर, आप्पा वैद्य ही ज्येष्ठ मंडळी आता नाहीत. पण त्यांचा वारसा त्यांची मुले सांभाळताहेत. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या रिझर्व्ह बँक कॉलनीतील ज्येष्ठ मंडळी आपल्या नातवंडाना पशुपक्ष्यांची किलबिल ऐकवण्यात मश्गूल आहेत.