‘परदेश प्रवासाची पंचविशी’चे झोकात प्रकाशन! जयंत पाटील आणि रामशेठ ठाकूर यांची हसतखेळत जुगलबंदी!
उलवे | प्रतिनिधी : मी व्यवसायात जी प्रगती केली, त्यात परदेश पर्यटनाचा सर्वाधिक फायदा मला झालाय. त्यामुळेच व्यवसायातील बारकावे समजले. आज इंटरनॅशनल व्यावसायिक होणे, ही काळाची गरज आहे आणि माझा तोच प्रयत्न आहे. महेंद्रशेठ हे अनेकांना परदेशात नेऊन नावलौकिक मिळवत आहेत, पण ही सारी त्यांच्या आई-वडिलांची पुण्याई आहे. त्यांच्या वडिलांनी कारावास भोगला आहे, याची मला जाण आहे, असे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या हस्ते उलवे नोडमधील शेलघर येथे ‘परदेश प्रवासाची पंचविशी’चे शनिवारी (ता. २) झोकात प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रामशेठ ठाकूर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड उपस्थित होते. ‘परदेश प्रवासाची पंचविशी’चे संपादन ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांनी केले आहे.
यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, “महेंद्र मेहनती आहे. अनेक वेळा मला तो सांगतो ते मी करतो, कारण त्याचे व्हीजन मोठे आहे. कालानुरूप त्याचे योगदान वेगळे आहे. अनेकांना त्याने सुटाबुटात फिरायला शिकवले आणि परदेशात नेऊन त्यांची स्वप्ने पूर्ण केली. महेंद्र हा हरहुन्नरी आहे. त्याची अशीच प्रगती होऊ दे, मी डावा उजवा करत नाही, पण माझ्या लेखी तो उजवा आहे.”
मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, “मला महेंद्रशेठ यांची कल्पना आवडली. परदेश प्रवासाची पंचविशी साजरी करणारे महेंद्रशेठ हे खरोखरच अवलिया आहेत. मी पहिल्यांदा अशा अनोख्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांनी जगातील सर्व देश फिरावेत, तेव्हा मी निश्चितच पुन्हा येईन, महेंद्रशेठ यांचे अनेकांना परदेशात नेण्याचे काम उल्लेखनीय आहे.”
यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड, काॅम्रेड भूषण पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, “परदेशात पहिल्यांदाच मी रामशेठ ठाकूर यांच्यामुळे गेलो. जयंत पाटील हे परदेश प्रवासाचे प्रणेते आहेत. मी त्या दोघांची प्रेरणा घेतली, पण आजही मी परदेश प्रवासाची परंपरा कायम ठेवली आहे.
सर्वसामान्य माणूस परदेशात गेला पाहिजे, हे सध्या माझे व्हीजन आहे. त्या दृष्टीने प्रवास सुरू आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाची शिदोरी पाठीशी आहे. सौभाग्यवती शुभांगीची भक्कम साथ आहे. त्यामुळे चालत राहण्याची भूमिका कायम आहे. त्यामुळेच कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा करतोय.”
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ यांना हायस्कूलमध्ये शिकविणारे लोखंडे सर, ढाणे सर, तसेच व्ही. एस. म्हात्रे सर हे यावेळी आवर्जून उपस्थित होते. एम. जी. ग्रुपने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.