ठाणे | प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात झालेल्या तेराव्या ‘अर्पण’ बासरी संगीत महोत्सवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना पं. चौरसिया म्हणाले, “वृंदावन आणि हरिद्वार दुसरीकडे कुठे नाही. येथे असलेल्या शेकडो बासरी वादकांमध्ये गुरूप्रती असलेली भक्ती आणि निष्ठा हीच खरी भारतीय संगीत परंपरेची ओळख आहे.” याप्रसंगी ठाणे महापालिकां अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते.
या गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात पंडित विवेक सोनार यांच्या १७५ शिष्यांनी सामूहिक बासरी वादन सादर केले. पाच वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंतच्या वयाच्या शिष्यांचा या वादनात सहभाग होता. विविध रागांवर आधारित हिंदी गाणी, भक्तिगीते आणि भावगीते त्यांनी बासरीवर सादर केली. ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ हे बालगीत प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.
कार्यक्रमात राग भिमपलासी, गोरख कल्याण, भूपाली, दुर्गा आणि वृंदावनी सारंग यांसारख्या रागांचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय ‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना’, ‘रुणुझुणु रे भ्रमरा’, ‘राधा ही बावरी’ आणि ‘बार बार देखो’ यांसारखी लोकप्रिय गीते बासरीवर सादर केली गेली.
पं. चौरसिया यांचे पाद्यपूजन पं. विवेक सोनार आणि त्यांच्या पत्नी कविता सोनार यांनी केले. भावविवश होऊन पं. चौरसिया म्हणाले, “ठाण्यात बासरीच्या गुरु-शिष्य परंपरेचे जे दृढ नाते पाहायला मिळते, ते देशातील अन्य कोणत्याही भागात दिसून येत नाही. त्यामुळेच माझ्यासाठी वृंदावन व हरिद्वार ठाण्यातच आहेत.”
वाद्य संगत म्हणून रवी नवले व अथर्व कुलकर्णी यांनी तबल्यावर, सचिन नाखवा यांनी ढोलकवर, तर किरण बेल्हे यांनी कीबोर्डवर साथ केली. समारोपाला पं. विवेक सोनार यांनी राग मियां मल्हार आणि हंसध्वनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रफुल्ल आठवले (तबला) आणि प्रताप पाटील (पखवाज) यांनी संगत केली.
कार्यक्रमाच्या ठाणे महापालिकेचे अनेक अधिकारीही उपस्थित होते.
या कार्यक्रमास युनियन बँकेचे व्यवस्थापक राजकुमार, टीजीएसबी बँकेच्या प्रमुख पौर्णिमा रानडे, अपेक्स फिनान्शियलचे अनंत चौधरी, स्वामी आधारवड संस्थेचे वैभव मलबारी, आणि टीप टॉप प्लाझाच्या श्रीमती स्मिता शहा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.