गेल्या ३० ते ४० तासांपासून महामार्ग जाम शाळकरी, चाकरमान्यांचे मोठेच हाल महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतुकीला फटका
वसई | प्रतिनिधी : गेल्या ३० ते ४० तासांपासून मुंबई अहमदाबाद महामार्ग जाम झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी व कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन करावा लागत आहेत. सतत वाहतुककोंडीच्या समस्येमुळे नागरिक मेटाकुटीस आले असून मुंबई अहमदाबाद महामार्ग हा वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू बनला आहे.
सलग ३० ते ४० तासांपासून मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या मुंबई वाहिनीवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागण्याचे चित्र दिसत आहे. वाहने जागेवरून देखील हलत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत असून चाकरमान्यांचा कामावर खाडा होत आहे. राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाने ज्या ठेकेदाराला महामार्गाचे काम दिले होते.
त्या महामार्गाकडून मोठ्या प्रमाणात नियोजनशून्य कारभार अवलंबला गेल्याने महामार्गाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांना बुजविण्यासाठी महामार्गावर डांबराच लेप दिला जात आहे. डांबराचा लेपस द्यायचा होता, तर मग महामार्गाचे काँक्रिटीकरण कशासाठी केले? त्यासाठी ६२१ कोटी रुपये निधी फुकटचा ठेकेदाराला का दिला?
अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व वाहतूकदारांमधून येऊ लागल्या आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर ससूनवघर व चेना यादरम्यान वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात उद्भवत असून त्याचा फटका शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी, व्यवसायिक व रीक्षा चालकांना बसू लागला आहे.
सध्या महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड बोजवारा उडाला असून या महामार्गावर वाहतूक व महामार्ग पोलीसच गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्गावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूककोंडीचा फज्जा उडत असून त्यावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करणे गरजेचे होते. परंतु पोलिसांकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्याचा फटका वाहतूकदारांना बसू लागला आहे.
दरम्यान न म्हणायला महामार्गावरील रॉयल गार्डन परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कार्यवाही केली जात आहे; परंतु ही कार्यवाही थातुरमातुर स्वरूपाची असल्याने वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गांभीर्याने कारवाई करण्याची धमक वाहतूक व महामार्ग पोलिसांत उरली नाही का? असा संतप्त सवाल वाहतूकदारांनी केला आहे.
दरम्यान महामार्गावर गेल्या ३० ते ४० तासांपासून झालेला जाम नागरिकांच्या व वाहन चालकांच्या संतापाचा भडाग्नी पेटविण्यास कारणीभूत ठरवू शकतो, अशी शक्यता आहे.