विरार | प्रतिनिधी : नालासोपारा-आचोळे येथील 41 अनधिकृत इमारत प्रकरणांत वसई-विरार महापालिका नगररचना विभागाचे निलंबित संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीतून अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वसई-विरार शहरातील वास्तुविशारद आणि पालिका अभियंत्यांच्या निवासस्थानी कारवाई केली. सोमवारी सकाळपासून मुंबईसह वसई-विरार शहरात 12 ठिकाणी छापे पडल्याने शहरात या कारवाईची जोरदार चर्चा होती.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मुंबई विभागीय कार्यालय-2 ने 14 मे व 15 मे 2025 रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) 2002च्या तरतुदींनुसार वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबादमधील वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधमोहिमेत 8.6 कोटी रोख रक्कम आणि 23.5 कोटी किमतीचे हिरजडित दागिने आणि बुलियन जप्त केलेले होते. वाय. एस. रेड्डी यांच्या बेहिशेबी संपत्तीचा मागोवा ईडीकडून घेतला जात होता. त्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.
इमारतींना परवानगी देण्यासाठी वास्तुविशारदांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले जात होते. रोख रकमेऐवजी सोन्याच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याचे आरोप आहेत. रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर अनेक वास्तुविशारद परदेशात निघून गेले होते, मात्र प्रकरण निवळल्याच्या समजातून ते शहरात परत आले होते. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित वास्तुविशारद आणि नगररचना विभागातील अभियंत्यांच्या घरी ईडीने छापे टाकलेले आहेत. मात्र या कारवाईचा अधिकृत तपशील ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नाही.
नालासोपारा पूर्व-आचोळे येथील 41 अनधिकृत इमारती न्यायालयाच्या आदेशानंतर वसई-विरार महापालिकेने निष्कासित केल्यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याने या अनधिकृत इमारती बांधल्या होत्या. या प्रकरणात शेकडो कुटुंब बेघर झाल्याने या प्रकरणाची माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी चौकशी करण्याची मागणी ईडीकडे केलेली होती. त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत होती.
दरम्यान; अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने 14 मे व 15 मे 2025 रोजी वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबादमधील वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधमोहिमेत 8.6 कोटी रोख रक्कम आणि 23.5 कोटी किमतीचे हिरजडित दागिने आणि बुलियन जप्त केलेले होते. याबाबतचे वृत्त समाजमाध्यमे, सोशल मीडिया, विविध दूरदर्शन वाहिन्या आणि वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झालेली होती. सदरचे कृत्य महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 च्या नियम 3चा भंग करणारे असल्याने आयुक्त अनिलकुमार पवार यांनी वाय. एस. रेड्डी यांना सेवेतून निलंबित केले होते.
***
प्रतिक्रिया
या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तक्रारकर्ते माजी नगरसेवक धनंजय गावडे यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती आम्ही अंमलबजावणी संचलनालया(ईडी)कडे केलेली होती. याशिवाय; या संदर्भात असंख्य तक्रारी ईडीकडे होत्या. पण कारवाई करावी अथवा नाही, हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असतो. परंतु सादर केलेल्या कागदपत्रांत आवश्यक माहिती सापडल्याने ईडीने कारवाई केलेली आहे. या प्रकरणाचे खरे गुरू आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीची मागणीही आम्ही केलेली आहे. पुढील आठवड्यात या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात येईल. त्या माध्यमातून आयुक्तांसंदर्भातील प्रकरणांची माहिती सर्वांसमोर आणली जाईल.
*– धनंजय गावडे, माजी नगरसेवक*
दरम्यान; या संदर्भात आयुक्त अनिलकुमार पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याकरता त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा प्रतिसाद मात्र मिळू शकलेला नाही.