आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना हा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा आणखी एक नवा प्रयोग राज्यातील जनतेला पाहायला मिळतो आहे. यापूर्वी पँथर नेते नामदेव ढसाळ यांनी शिवसेनेसोबत हात मिळवला होता. त्यानंतर विद्यमान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुरुवातीला शिवसेना आणि नंतर भाजपासोबत संधान बांधून आपला ‘रिपब्लिकन’ ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला.
आंबेडकरी आणि रिपब्लिकन चळवळीला अन्यायाविरोधात पेटून उठून रस्त्यावरचा संघर्ष करण्याचा परंपरागत इतिहास आहे. ज्या शिवसेनेसोबत कायम संघर्ष केला त्याच शिवसेनेसोबत युती करताना नामदेव ढसाळ, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आपआपल्या गटाची राजकीय भूमिका घेतली. 1960 च्या दशकापासून आजपर्यंत दलित पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाने गटातटांचे अनेक तंबू उभे राहत गेले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षांची स्थापना करताना ‘शासनकर्ती जमात बना’ हा दलित, मजूर, शेतकरी आणि कामगार वर्गातील जमातीला दिलेला संदेश कधी सत्ता आणि समाज परिवर्तनात परावर्तित झाल्याचं पाहायला मिळालं नाही.
कधी काँग्रेस, कधी शिवसेना, कधी भाजपा तर कधी राष्ट्रवादीसोबत रिपब्लिकन गटाचा कुणीतरी नेता राजकारणासाठी टिळा आणि निळ्या झेंड्यापुरता आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेपुरता उभा राहिला.
आपल्यावरील अत्याचाराविरोधात चवताळून, पेटून उठणारा आंबेडकरी समाज एक वैचारिक ताकद आणि संघटन म्हणून नेत्यांच्या पुढे जावून आजही कायम अग्रस्थानी उभा राहतो. पण, रिपब्लिकन नेते कधी एका पंक्तीला बसतील आणि कधी फुटतील, याचा वर्षानुवर्षाचा अनुभव समाजातील कार्यकर्त्याला असल्यानं तो विविध पक्ष, संघटना आणि नेत्यांनी उभारलेल्या गटागटांच्या तंबूत विखुरल्याचं पाहायला मिळतं. निवडणूक काळात तर कुठे आणि कुणाला मतदान करावं, ही संभ्रावस्था नेत्यांची राजकीय भूमिका सुस्पष्ट नसल्यानं रिपब्लिकन जनतेत पाहायला मिळते. 1970 ते 72 अशी दोनच वर्षे बिजलीसारखा कडाडून सामाजिक परिवर्तनाची नांदी होवू पाहणारा दलित पँथर फक्त एक इतिहास बनून आजच्या-कालच्या पिढीपुढे उभा राहिला.
पँथरला एक राजकीय शक्ति म्हणून उभं राहता आलं नाही. एकसंध रिपब्लिकन आणि भावाभावांतील एकीच्या बळावर 1998 च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून 3 लाख 66 हजार 427 मतांनी निवडणून आले. तर अमरावतीमधून रा. सु. गवई हे 3 लाख 4 हजार 746 मतांनी निवडून आले होते. चिमूर मतदारसंघातून प्रा. जोगेंद्र कवाडे हे 3 लाख 50 हजार 3 मतांनी निवडून आले होते. तर उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून रामदास आठवले हे 2 लाख 82 हजार 373 मतांनी निवडून आले होते.
ही रिपब्लिकन नेत्यांची आणि एकीच्या बळाची दैदिप्यमान कामगिरी पाहता पुढे या इतिहासाची कधीच पुनरावृत्ती घडली नाही. पण, आजही रिपब्लिकन नावाचा टिळा लावल्याबगर सत्ताधारी किंवा विरोधकांना पुढे जाता येत नाही. 30 सप्टेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन हा पक्ष विसर्जित करून
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नामक पक्षाची घोषणा केली. परंतु, हा पक्ष संघटन रूपात उभा राहण्याआधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांनी राजकीय सत्तेचा आग्रह धरला, कारण बाबासाहेब राजकीय सत्तेला समाजपरिवर्तनाचे एक साधन मानीत होते. राजसत्ता हे अर्थव्यवस्थेचे एक अभिव्यक्त रूप असते, म्हणून सामान्य माणसांना सामाजिक, आर्थिक न्याय देण्यासाठी राजसत्ता आपल्या हातात पाहिजे. परंतु ती येणार कशी? भारतीय समाजात अनेक जाती असल्यामुळे भारतीय समाजात इतर देशांप्रमाणे आर्थिकदृष्ट्या स्पष्ट वर्ग नाहीत.
जातिसंस्थेने वर्गीय चळवळीला नेहमीच कमकुवत बनविलेले असल्याने राजकीय क्रांतीची शक्यताही भारतात जवळजवळ नव्हतीच. आंबेडकरांच्या समोर त्यावेळी प्रश्न होता तो राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा; आणि जातिसंस्था या मार्गातील सर्वात मोठा अडसर होती. यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाचा केलेला प्रयोग महत्त्वाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मुक्ती चळवळीचा वर्गीय जाणिवेचा ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ नावाने राजकीय पक्ष स्थापन केला होता.
या पक्षाच्या जाहीरनाम्यात डॉ. आंबेडकरांनी वैधानिक समाजवादाची कल्पना मांडली ती प्रचंड आश्वासक होती. आंबेडकरांनी शासनकर्ता जमात होण्याच्या दृष्टीने स्वतंत्र मजूर पक्ष स्थापनेच्या काळातच निवडणुका लढवून सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने-समविचार पक्षाशी युती करून आपले उद्दिष्ट प्राप्त करण्याचे योजले होते. या दृष्टीने त्यावेळची त्यांची भूमिका, तिचे संदर्भ पाहण्यासारखे आहेत. सत्ता कशासाठी मिळवायची तर सामाजिक परिवर्तनाचे चक्र अधिक गतिमान करण्यासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक समता प्रस्थापित करण्यासाठी देश अखंड ठेवण्यासाठी संघराज्य अधिक समर्थ करण्याची कल्पना त्याही काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात घोळत होती. स्पृश्य, अस्पृश्य वर्गातील कष्टकरी, शेतकरी आणि कामगार वर्गाला सत्तेची फळे चाखता यावीत, या विचारातून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती.
परंतु, त्यांच्या महानिर्वाणानंतर हा पक्ष एकसंध आणि व्यापक भूमिकेतून उभारी घेवू शकला नाही. 3 ऑक्टोबर 1957 मध्ये दादासाहेब गायकवाड, एन शिवराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव आंबेडकर, पी. टी. बोराळे, ए. जी. पवार, दाटा कट्टी, दादासाहेब रुपवते, आबा पी. टी मधाळे यांच्या पुढाकारातून रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. आजघडीला बाबासाहेबांचा आरपीआय हा विशाल पक्ष जवळपास 52 गटांत विखुरला आहे. हा रिपब्लिकन एकसंध, एकजूट व्हावा बाबासाहेबांची लेकरं एकाच ताटी बसावी यासाठी आंबेडकरी कलावंतांनी वर्षानुवर्षे कवने रचली, जनजागृती केली. साहित्य विश्वातील मंडळींनीही यासाठी पुढाकार घेतला. परंतु, ऐक्य घडलं कधी नी मोडल कधी याचा मागमूस रिपब्लिकन आंबेडकरी जनतेला कधी लागला नाही.
आज विविध सरकारी, खासगी आणि छोट्या-मोठ्या उद्योगांत पाय रोवून आंबेडकरी समाज उभा आहे. या वर्गालाही आपली सुस्पष्ट सामाजिक भूमिका असावी, असं कायम वाटत आलं आहे. पण, नेत्यांच्या धरसोड वृत्तीमुळं त्याच्या पदरी निवडणुकामागून निवडणुकांत नैराश्यच आलं आहे. रिपब्लिकन ऐक्याचे, युतीचे नवे, जुने प्रयोग पाहिलेला कार्यकर्ताही आज मुंबई, ठाणे, पुणेसारख्या महानगरांत आपली राजकीय स्पेस कुठे आहे, याचा शोध घेतो आहे. परंतु, जनतेचं ऐक्य कुणासोबत हा प्रश्न कायमच अनुत्तरित राहिला आहे. आजही 80 च्या दशकापासून ऑडिओ, व्हीडिओनंतर आज यूट्यूब आणि सर्वच माध्यमांत वाजणार तेच तेच गाणं ऐकून ऐक्यासाठी साद घालणं सुरूच आहे.
सैनिक हो भिमाचे भिमराव आठवा रे, चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे! सासू-सुना असो वा अथवा त्या मायलेकी
भावाचा वैरी भाऊ सर्वांनी करा एकी
एकात-एक यारे बापात लेक जारे
चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे!