‘दशावतार,राखणदार आणि बाबुली मिस्त्री’.
● थोड उशिरा का होईना पण आता आपल्या कोकणातला निसर्ग, संस्कृती आणि लोककला रुपेरी पडद्यावर दिसायला लागली आहे याचा खुप आनंद आहे.’राखणदारा’ बद्दल नितांत आदर आणि श्रद्धा अजून कोकणात टिकून आहे म्हणूनच ‘कोकणातला चाकरमानी म्हूंबयसहून खास राखण देऊक गावाला येतलो’.
कोकणातल्या लोकांची श्रद्धा,त्यांच भावविश्व तिथल्या रूढी परंपरा आणि तिथं होणारा विकास या सगळ्याला अनुसरून कोकण वासियांच्या डोळ्यात म्हणण्यापेक्षा मनांत जळजळीत अंजनाचे दोन थेंब टाकणारा आणि सिनेमाच्या मध्यंतरालाच तुमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणारा सुबोध खानोलकर लिखित आणि दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमा जसा मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा तसा हा सिनेमा प्रत्येकाने बघावा असाच आहे.
सुबोध खानोकर यांच अप्रतिम लेखन,लाजवाब संवाद हा ‘दशावताराचा आत्मा’ आहे आणि दिलीप प्रभावळकरांचा अभिनय ‘दशावताराचा श्वास’ आहे.खुपच तगड्या स्टार कास्ट ची फौज घेऊन सिनेमा बनवला आहे.सिद्धार्थ आणि प्रियदर्शनी ची जोडी खुप छान शोभून दिसते आहे.भरत जाधव,सुनील तावडे,अभिनय बेर्डे,गीतकार गुरु ठाकूर,विजय केंकरे यांच्याही भूमिका छान.दिलीप प्रभावळकारांनंतर अभिनयासाठी कुणाच नावं घ्यावं तर ते आहे ‘मायकल डिकोस्टा’ साकारणारे ‘महेश मांजरेकर’.या भूमिकेला पूरक असलेला जॉनर मांजरेकरांच्या ठाई अगोदरपासूनच आहे.
त्यामुळे मांजरेकरांची एंट्रि त्यांना साजेशी अशीच आहे.मांजरेकरांसारख्या हायव्होल्टेज पर्सनॅलिटीची एंट्री सिनेमाच्या मध्यांतरा नंतर होते आणि तरीही मी प्रभावळकरां नंतर अभिनयाच्या बाबतीत मांजरेकराचं नावं घेतोय यावरून दिग्दर्शकाने या भूमिकेचा प्रोटोकॉल किती काळजीपूर्वक सांभाळलाय आहे हे लक्षात घ्या.
दशावतार हा फक्त दोघांचाच सिनेमा आहे एक या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि दुसरे ‘बाबुली मिस्त्री’ म्हणजेच सशक्त अभिनयाचे भीष्माचार्य CAPTAIN OF THE SHIP दिलीप प्रभाळकर.अतिशय आव्हानात्मक आणि शारीरिक दृष्ट्या चॅलेंजीग असलेला ‘बाबुली मिस्त्री’ प्रभाळकरांनी अजरामर केला आहे.
हा बाबुली मिस्त्री प्रभावळकरांच्या वाट्याला खुप उशिराच आलाय.ज्या वयात आपल्याला जीवन गौरव मिळायला हवा त्या वयात दिलीप काकांनी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार द्यायला भाग पाडलं आहे.इतका आपल्या सशक्त अभिनयाने फुल्ली लोडेड असा नुसताच बाबुली मिस्त्री नाही तर ‘शाश्वत बाबुली मिस्त्री’ करून ठेवला आहे.’दशावतार’ का बघावा तर तो कोकणासाठी आणि दिलीप प्रभावळकरांसाठी बघावा इतकंच.
काही प्रसंगाची परिणामकता यासाठी व्हिएफेक्स ची मदत घेतली गेलेय ती इतकीही नाही कि दशावतारची तुलना साऊथ इंडियन सिनेमाशी व्हावी.याच व्हिएफेक्स च्या मदतीने चित्रपटाच्या अगदीच सुरवातीला काजवे लुकलूकताना दिसतात पण संपूर्ण चित्रपटभर आपल्या तगड्या लेखणीने आणि संवादाने सुबोध खानोलकर तुमच्या अंतरमनातल्या सुप्त काजव्यांना खाडकन जागे करतात.सिनेमाच्या उत्कंठावर्धक शेवटापेक्षा जास्त परिणामकारक या चित्रपटाचा ‘मध्यांतर’ झालाय.तुमची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचते कि मध्यांतरात पॉपकॉर्न खायची १० मिनिटांची उसंत सुद्धा नकोशी वाटते.
गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आणि अजय गोगावलेंच्या आवाजातलं ‘रंगपूजा’ तुम्हांला नंटरंग मधलं ‘खेळ मांडला’ या गाण्याची आठवण करून देत.फक्त या एका गाण्यापुरतेच या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक ए.व्हि.प्रफुल्लचंद्र लक्षात राहतात बाकी अजून पुर्ण दशावतार मध्ये प्रफुल्लचंद्रांकरवी सोनं करायच बाकी राहुन गेलंय.पार्श्वसंगीताच्या बाबतीत कोकणच्या मातीच्या अत्तराचा सुगंध मिसिंग वाटला.त्यामुळे अमराठी संगीत दिग्दर्शकाच्या हाती मराठी सिनेमा पडणं म्हणजे मोमोज ला मोदक समजून गोड मानून घेण्यासारखं आहे.असो.
कोणतीच गोष्ट परिपूर्ण नाही आणि चित्रपट म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायॉलॉजि अर्पून बघायची गोष्टच नाही.जर तुम्हांला या लेन्स लावायच्याच असतीलच तर त्या कोकणाकडे पहाताना लावा,’कोकणची रंगपूजा’ अजून उजळून निघेल.
हा चित्रपट म्हणजे कोकणचा दशावतार नव्हे,कथेला पूरक संदर्भ म्हणुन या लोककलेची मदत घेण्यात आली आहे.पण या कथेतुन काय सांगायचंय यासाठी लेखक म्हणुन सुबोध खानोलकर आणि त्यांची मित्रमंडळी कमालीची यशस्वी झाली आहेत.
‘एप्रिल मे ९९’ च्या माध्यमातून रोहन मापुस्करांनी कोकणाला पहिली ट्रॉफी बहाल केली आणि आता सुबोध खानोलकरांनी ‘दशावतार’ नावाची अजून एक ट्रॉफी बहाल केली आहे.कुर्ला टू वेंगुर्ला ऑन द वे आहे.या आणि अशाच ट्रॉफ्यांनी आमचा कोकणाचा शोकेस दुथडी भरून व्हावंन्दे रे महाराजा. बाकीचा जा काय चुकला माकला असलाच तर ‘राखणदार’ बघून घेतलोच.
✍🏻प्रसाद बेंडखळे,लांजा.
#konkan
#दशावतार
#subodhkhanolkar
#DilipPrabhavalkar