महाड शहरातील रस्त्यांना खड्डेच खड्डे देखभाल दुरुस्तीचा पैसा जातो कुठे
महाड – निलेश पवार : ऐतिहासिक महाड शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पैसा खर्च केला गेला मात्र अवघ्या महिनाभरातच टाकलेल्या डांबराचे डोंगर तयार झाले आहेत. यामुळे खड्डे बरे होते अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत.
महाड शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे यामुळे या ठिकाणी प्रतिवर्षी लाखो पर्यटक त्याचप्रमाणे भीम अनुयायी महाड शहरात येत असतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय सुधाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बहुतांश रस्ते कॉंक्रिट करण्यात आले होते. जवळपास वीस वर्षानंतर या रस्त्यांना आता खड्डे पडले आहेत. काँक्रीट रस्ते असल्याकारणाने यावर पडलेले खड्डे काँक्रिटनेच भरणे आवश्यक आहे मात्र या ठिकाणी डांबराचे पॅच मारून खड्डे भरले जात आहेत.
तर काही ठिकाणी केवळ खडी टाकून खड्डे भरल्याचे भासवले गेले आहे. यामुळे दुचाकी आणि इतर वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्डे भरण्याकरता पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते मात्र भर पावसामध्ये खड्डे भरण्याची प्रक्रिया महाड नगरपालिकेकडून करण्यात आली होती यामुळे डांबर मिश्रित साहित्याने भरलेले खड्डे अवघ्या एक महिन्यातच उघडे पडले.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे मात्र महाड नगर प्रशासनाकडून अध्याप कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. सुस्त प्रशासनामुळे ठेकेदारांचे चांगलेच फावले आहे. ठेकेदारांकडून मनमानीपणे कामे केली जात आहे याचा फटका मात्र गुणवत्तेवर बसत आहे. गुणवत्ता नसलेल्या मटेरियल मुळे उत्तम दर्जाची कामे होत नसल्याचे या खड्ड्यांवरून दिसून येत आहे. त्यातच काही जोड रस्त्यांवर देखील पक्के डांबरीकरण केले गेले नसल्यामुळे या ठिकाणी देखील खड्डे पडले आहेत.
रस्त्यांच्या मधोमध असलेले जोड देखील सताड उघडे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे तसेच रस्त्यामधील जोड भरणे आवश्यक आहे. बाप्पाच्या मिरवणुकी त्याचप्रमाणे विसर्जन यावेळी या खड्ड्यांचा त्रास महाडकरांना होणार आहे.
महाड शहरातील एसटी स्थानक ते छ. शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दस्तुरी नाका, दस्तुरी नाका ते चवदार तळे, कोटेश्वर ते उभा मारुती, उभा मारुती ते पंचायत समिती, पंचायत समिती पासून काकरतळे, एसटी स्टँड पासून काकरतळे मोहल्ला ते काकरतळे मैदान, वीरेश्वर मंदिर ते दादली पूल, महाड आयटीआय पासून बडोदा बँक, अशा अनेक रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे.
या सगळ्या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी करोडो रुपयांची आवश्यकता आहे. तसेच या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी मास्टर प्लॅन तयार होणे आवश्यक आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्यांवर टाकण्यात येणारा डांबर हा निकृष्ट दर्जाचा असल्याने त्यातील खडी आणि इतर मटेरियल अवघ्या पंधरा दिवसातच बाहेर पडत आहे. यामुळे नागरिकांचे मात्र चांगलेच हाल होताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून महाड शहरातील या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा निषेध म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. २५ ऑगस्ट रोजी अशा अभिनव स्पर्धेचे आयोजन करून बक्षीस देखील ठेवण्यात आलेले आहे.
महाड शहरामध्ये खड्डे भरण्याच्या नावाखाली स्वतःची खिसे भरले जात आहेत, आधीच बेमालूमपणे माती वाळू यातून पैसा खाण्याचे प्रकार सुरू होते आता खड्डे भरण्यातून देखील भ्रष्टाचार केला जात आहे – पराग वडके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड शहराध्यक्ष. गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे काम सुरू केले जात आहे काही ठिकाणी खड्डे भरण्याचे काम सुरू देखील झालेले आहे. नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी पालीका प्रशासनाकडून घेतली जाईल – धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी महाड