ठाणे | प्रतिनिधी :- भारताच्या संविधान स्वीकारल्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने ‘AGNI’ (Active Governance National Initiative) तर्फे ‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ या शीर्षकाखाली एक विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात आज राज्यभर करण्यात आली.या अभियानाचा उद्देश तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्यांची जाणीव, अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे.
ठाणे येथील टाउन हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, कोर्टनाका (पश्चिम) येथे या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘AGNI’चे संचालक श्री. निखिल पोहेकर यांनी केले. त्यांनी या अभियानामागील उद्दिष्टे स्पष्ट करत संविधानाचा सर्वांगीण अभ्यास का गरजेचा आहे, हे अधोरेखित केले.
स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले की agniindia.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी संविधान विषयक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुंदर, सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे. ते ऐकायचं आहे व त्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवायची आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे मिळणार आहेत.
या उपक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक महाराष्ट्र सम्राटचे संपादक श्री. गणेश भोईटे, दैनिक सम्राट चे कार्यकारी संपादक श्री. कुणाल कांबळे, तसेच इतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. मधुरा वेलणकर-साटम. त्यांनी संविधान आज वाचणे का गरजेचे आहे, यावर मार्मिक भाष्य करत सांगितले की, “नागरिक म्हणून आपल्याला संपन्न आणि सजग बनवण्यासाठी संविधानाचे नीट वाचन आणि समज आवश्यक आहे.”
या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी www.agniindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.