कामणहून सुटणारी एसटी बस अचानक बंद! विद्यार्थ्यांची वसई एसटी महामंडळ कार्यालयाला धड
विरार | प्रतिनिधी : एसटी महामंडळाच्या धरसोड वृत्तीमुळे सकाळी साडेपाच वाजता कामणहून सुटणारी एसटी बस अचानक बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागले, पोमण, मोरी, कामण, कोल्ही, चिंचोटी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय झालेली होती. किंबहुना बसचा प्रवास कामणऐवजी नागले गावापासून सुरु करण्यात आला. त्यामुळे कॉलेज विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये पोहोचण्यास उशीर होत होता. याबाबत विचारणा किंवा तक्रार केल्यास एसटी महामंडळाचे संचालक विद्यार्थ्यांना अरेरावीची उत्तरे देत होती. या दांडगाईविरोधात माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे व कामणचे माजी सरपंच दिनेश म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांसह वसई एसटी महामंडळ कार्यालयात शनिवार, 2 ऑगस्ट रोजी धडक दिली.
प्रथमत: कामण येथील दिनेश म्हात्रे यांनी एसटी महामंडळाच्या वसई कार्यालयाला फोन करून विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची माहिती दिली होती; परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलेले नव्हते. त्यामुळे माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे व कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या वसई कार्यालयात भेट दिली होती. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयीची लेखी माहिती दिली होती. त्या वेळी एसटीच्या महिला अधिकाऱ्यांनी मुलांची गैरसोय करणार नसल्याचे आश्वासन दिले; परंतु अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला व बस सुरूच केली नाही.
परिणामी; 2 जुलै रोजी सकाळी कॉलेज विद्यार्थ्यांसह पुन्हा एकदा एसटीच्या वसई कार्यालयात धडक देण्यात आली. परंतु; एसटीच्या महिला अधिकारी नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित नव्हत्या. म्हणून एसटी कार्यालयात गेलेल्या सर्वांनी कार्यालयाचा ताबा घेऊन जोपर्यंत जबाबदार अधिकारी स्वतः येऊन समस्यांचे निवारण करत नाहीत, तोपर्यंत कार्यालयातून मागे हटणार नाही, असा निर्धार विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी केला.
अखेरीस महामंडळाचे सानप नावाचे अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि सकाळी साडेपाच वाजता कामणहून सुटणारी बस तात्काळ सुरू करत असल्याचे आश्वासन दिले. एसटी महामंडळाची सध्याची अवस्था आत्यंतिक वाईट आहे. अपुऱ्या एसटी बस, अपुरा कर्मचारी वर्ग व भंगार बस आणि आर्थिक तोटा यामुळे एसटी महामंडळ डबघाईला आलेले आहे.
महानगरपालिकेच्या स्थापनेपूर्वी बसेस आणि कर्मचाऱ्यांच्या वावराने गजबजलेला एसटी डेपो आता मरणासन्न झाल्याचे विदारक चित्र आहे. त्याही परिस्थितीत एसटीने विद्यार्थ्यांना बस सुरू करून दिल्याने माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे व सरपंच दिनेश म्हात्रे आणि विद्यार्थ्यांनी महामंडळाचे आभार मानले.
***