शब्द संवाद दिवाळी अंक प्रकाशित शब्द संवाद वाचकांची मने जपणारा दिवाळी अंक – खा.सुनील तटकरे
महाड | प्रतिनिधी : सलग चार राज्यस्तरीय पुरस्कार विजेता शब्द संवाद या जनामनातील आणि मनामनातील दिवाळी अंकाचे प्रकाशन रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी शब्द संवाद या दिवाळी अंकाने वाचकांची मने जिंकण्याचे काम केले आहे. वाचनीय दर्जा राखत दिवाळी अंकांची साहित्यिक परंपरा जपण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार यावेळी केले.
महाड मधून प्रकाशित होणारा शब्द संवाद या दिवाळी अंकाचे हे चौथे वर्ष आहे. गेली तीन वर्ष सातत्याने शब्द संवाद दिवाळी अंकाने जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. या चौथ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शब्द संवादचे संचालक संपादक निलेश पवार, वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे, जनसंवाद संस्थेचे दिलीप मुजुमले, संजय रास्ते, इस्माईल हुर्जुक आदी पदाधिकारी आणि हितचिंतक उपस्थित होते. या चौथ्या दिवाळी अंकामध्ये पर्यटनातून आलेले अनुभव या विषयावर लिखाण प्रकाशित झाले असून खा.सुनील तटकरे, छ.संभाजीराजे, पद्मश्री विकास महात्मे, श्रीपाद टेंबे, आमदार प्रवीण दरेकर यांच्या लेखांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे इतर साहित्य देखील वाचकांच्या पसंतीस उतरणारे आहे.
यावेळी सुनील तटकरे यांनी शब्द संवाद दिवाळी अंक हा केवळ दिवाळी अंक नसून वाचकांच्या मनाचा वेध घेणारा दिवाळी अंक असल्याचे सांगितले. शब्द संवाद दिवाळी अंकाची साहित्यिक परंपरा अशीच वृद्धिंगत होत जावो अशा शुभेच्छा देखील दिल्या.
या दिवाळी अंकासाठी संपादक विनोद साळवी, कला संपादन केतन बंगाल यांसह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांच्या मेहनतीनेच वाचनीय दिवाळी अंक वाचकांच्या हातात देताना मनस्वी आनंद होत असल्याचे यावेळी संचालक संपादक निलेश पवार यांनी सांगून सगळ्यांचे आभार व्यक्त केले.