
मनुस्मृतीदिनी दहन दिनी क्रांतीस्थंभाला अभिवादन महिलांच्या प्रगतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे – आनंदराज आंबेडकर
महाड – प्रतिनिधी :- महाड क्रांतिभूमी मध्ये ९८ वा मनुस्मृति दहन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागातून क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी महिला आणि भीमअनुयायी महाडमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी मनुस्मृति दहन दिन हाच आमचा खरा स्वातंत्र्य दिन असल्याचे स्पष्ट केले.
ऐतिहासिक महाड क्रांती भूमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनु लिखित मनुस्मृति या ग्रंथाचे दहन केले होते. या घटनेची स्मृती म्हणून महाड क्रांतिभूमी मध्ये मनुस्मृती दहन दिन गेली कांही वर्ष साजरा केला जात आहे.
यावर्षी मनुस्मृति दहन दिनाचे ९८ वे वर्ष असून हा सोहळा विविध संघटनांच्या माध्यमातून आज साजरा करण्यात आला. यावेळी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मानव मुक्ती दिन सभेसाठी आनंदराज आंबेडकर हे उपस्थित होते. महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये भीम अनुयायी आज महाडमध्ये दाखल झाले होते. ऐतिहासिक चवदार तळे आणि क्रांतीस्तंभ या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील गावस्कर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी देखील या ठिकाणी अभिवादन केले.

यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य करत देशांमध्ये आजही मनूचा विचार जिवंत असल्याचे सांगून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केल्यानंतर खऱ्या अर्थाने देशातील दलित शोषित पीडित लोकांची गुलामगिरीच्या जोखडातून मुक्ती मिळाली असे स्पष्ट केले. या मनुस्मृति दहनातून महिलांना शिक्षणाचा अधिकार देखील मिळाला त्यामुळे महिलांच्या प्रगतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे असल्याचे देखील सांगितले.
विकास वंचित दलित राष्ट्रीय महिला मंडळाच्या संस्थापिका डॉ. प्रमिला लीला संपत यांच्या वतीने मनुस्मृति दहन दिनी महिला मुक्ती दिन साजरा केला जातो. या वेळी आलेल्या हजारो महिलांनी महाड मधुन महिला जनजागृती रॅली देखील काढली. या रॅलीच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष देखील केला. महिलांच्या प्रगती मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे असून मोलाचे आहे असे सांगितले.

आलेल्या महिलांची गैरसोयच मनुस्मृति दहन दिनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो महिला दाखल होतात. या ठिकाणी आल्यानंतर पालिकेच्या किंवा स्थानिक प्रशासनाच्या वतीने त्यांच्या राहण्याची किंवा स्वच्छतागृहांची ज्या पद्धतीने सुविधा करणे आवश्यक आहे ती सुविधा करण्यात न आल्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर देखील भोजनाची व्यवस्था केली गेली नसल्याने शेकडो मैल दूरवरून आलेल्या महिलांना स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःलाच करावी लागली.