गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर

0

गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सुप्रसिद्ध पत्रकार, जेष्ठ कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना गाथा अभ्यासक मारुती महाराज जाधव तळाशीलकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 25 हजार रुपये रोख मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या शुभहस्ते येत्या 29 सप्टेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार समितीचे प्रमुख अरुण जाधव यांनी दिली.

गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर यांच्या प्रथम पुण्यस्मृरणाच्या निमित्ताने येत्या या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी माजी खासदार सदाशिव मंडलिक, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम महाराज अध्यासनाचे समन्वयक नंदकुमार मोरे, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी वेदांत केशरी मारुती महाराज तुंतुने यांचे प्रवचन तर लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे कीर्तन होणार आहे.

मारुती जाधव तळाशीलकर हे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेचे अभ्यासक होते. त्यांचे गाथा निरूपण शिवाजी विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. संत साहित्य आणि त्यातील सामाजिक समतेचा विचार मारुती जाधव यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार याच विचाराशी समर्पित व्यक्तीला देण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला.

त्यानुसार जगद्गुरु तुकाराम महाराज आणि सर्व वारकरी संतांचा विचार समाजात रुजवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, असेही अरुण जाधव यांनी सांगितले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech