महाड | प्रतिनिधी : महाड औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि एम एम ए सि ई टि पी चे चेअरमन अशोक नरोत्तम तलाठी यांना त्यांनी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना “उद्योग श्री “पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लघू उद्योग भारती आणि जिल्हा उद्योग केंद्र रायगड यांच्या तर्फे अशोक तलाठी यांना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पनवेल येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल , रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भोसले आदींसह उद्योग क्षेत्रातील मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
महाड औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेपासून अशोक तलाठी हे एक स्थानिक उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. महाड उत्पादक संघटना व एम एम ए सि ई टी पी या महाड औद्योगिक क्षेत्रातील संस्थांमध्ये अशोक तलाठी हे सक्रियपणे कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल जिल्हा उद्योग केंद्राने घेवून अशोक तलाठी यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशोक तलाठी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.