■अर्नाळा बेट विकासापासून वंचित
वसई (प्रतिनिधी): मुंबईपासून अगदी जवळ असलेले अर्नाळा किल्ला बेट आजही मूलभूत सुविधांसाठी तडफडत आहे. देश चंद्रावर पोहोचतोय पण स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही येथील रहिवाशांना आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि दळणवळण या अत्यावश्यक सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. शासनाचे दुर्लक्ष आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हे ऐतिहासिक गाव विकासापासून वंचित राहिले आहे.
अर्नाळा किल्ला हे समुद्रातील बेट असल्यामुळे गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी फक्त बोटीवर अवलंबून राहावे लागते. संध्याकाळी सातनंतर बोटसेवा थांबते त्यामुळे नोकरी-शिक्षणासाठी वसई, विरार, मुंबईला जाणाऱ्यांना मोठा त्रास होतो. योग्य वेळेत पोहोचता न आल्याने अनेक तरुण चांगल्या नोकरीच्या संधी गमावतात. त्यामुळे गावात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे.गावात एकही दवाखाना नसल्याने रुग्णांची गैरसोय होते.
रात्री-अपरात्री एखादा रुग्ण किंवा गर्भवती महिला गंभीर अवस्थेत आल्यास त्यांना नेण्यासाठी फक्त समुद्री प्रवासावरच अवलंबून रहावे लागते. अनेक वर्षांच्या मागणीनंतरही प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली नाही. परिणामी जीव धोक्यात घालून रुग्णांना किनाऱ्यावर यावे लागते.अर्नाळा किल्ला पर्यटनासाठी उत्तम केंद्र ठरू शकतो. परंतु शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी होत नाही. गावाला मुख्य भूमीशी जोडण्यासाठी पुलाची गरज असून जेट्टीचे काम गेली चार वर्षे संथ गतीने सुरू आहे. ते कधी पूर्ण होईल, याची खात्री प्रशासन देऊ शकत नाही.सुमारे अठरा वर्षांपूर्वी तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नांमुळे गावात वीज आली.
त्यामुळे शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रात तरुणांनी प्रगती केली. मात्र, दळणवळण आणि आरोग्याच्या अपुऱ्या सुविधांमुळे त्यांची स्वप्नं आजही अर्धवट राहिली आहेत. दरम्यान,शासनाने तातडीने समस्या सोडवाव्यात आणि अर्नाळा किल्ल्याला विकासाच्या प्रवाहात आणावे. अन्यथा, गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘अमेरिका पोहोचली चंद्रावर, आपण अडकलो बंदरावर’ हीच शोकांतिका कायम राहील.