प्रतिनिधी | विरार : गणेश मूर्तिकारांना मोफत शाडू माती उपलब्ध करून देण्याच्या वसई-विरार महापालिकेने दिलेल्या आश्वासनावर निर्णय होत नसल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर तब्बल 240हून अधिक मूर्तिकारांसमोर संकट उभे राहिले आहे. पालिका मूर्ती उपलब्ध करून देणार कधी आणि त्यातून मूर्ती साकारणार कधी? या चक्रव्यूहात मूर्तिकार सापडले आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त शाडूच्या मूर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. त्या अनुषंगाने पालिका मुख्यालयात 10 जुलै रोजी मूर्तिकारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मूर्तिकारांसमोरील समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या होत्या. प्रसंगी विरार-वसई मूर्तिकार गणेश संस्थेचे अध्यक्ष जितेश पालकर यांनी पहिल्या टप्प्यात किमान 25 पारंपरिक मूर्तिकारांना प्रति मूर्तिकार 40 गोणी माती उपलब्ध करून द्यावी; तसेच व्यवसायाकरता आवश्यक मंडपास मूल्य आकारू नये, अशी सूचना केली होती.
दरम्यान; शाडू मातीच्या उपलब्धतेकरता तीन विक्रेत्यांची आवश्यकता पालिकेने व्यक्त केली होती. माती किमतीचा तुलनात्मक अभ्यास करून कमी किमतीच्या दरातील शाडू माती खरेदीचा निर्णय घेण्यात येणार होता. त्यानुसार या संस्थेने पालिकेला वितरकांची सूचीही सुपूर्द केली होती; परंतु सदर विक्रेत्यांनी माती खरेदीची 100 टक्के रक्कम आगाऊ मागितलेली असल्याने पालिकेला ही अट मान्य नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी; शाडू माती खरेदीचा निर्णय रखडल्याचे म्हटले जात आहे.
निर्णय होत नसल्याने शहरातील 240 हून अधिक मूर्तिकारांसमोर संकट निर्माण झाले आहे. पालिका माती खरेदी करणार कधी आणि त्यातून आम्ही मूर्ति साकारायच्या कधी? असा प्रश्न यानिमित्ताने विरार-वसई मूर्तिकार गणेश संस्थेचे अध्यक्ष जितेश पालकर यांनी केला आहे. शाडू माती खरेदीचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, यासाठी या संस्थेने आतापर्यंत महापालिकेला तब्बल तीन स्मरणपत्रे दिली असल्याचेही ते म्हणाले.
प्रतिक्रिया : मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांनी शाडू माती खरेदी करून मूर्तिकारांना वितरित केलेली आहे. वसई-विरार महापालिका नियमबाह्य व अनावश्यक विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना मूर्तिकारांबाबत अशा पद्धतीची भूमिका घेत असेल तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. किमान माणुसकीची भावना आणि पारंपरिक संस्कृती-धार्मिक महत्त्व कायम राखण्याच्या सदहेतूने तरी महापालिकेने हा निर्णय तात्काळ घ्यायला हवा. – नारायण घाडी, माजी उपाध्यक्ष, विरार शहर मंडळ भाजप
शाडू माती खरेदीसंदर्भातील फाईल आयुक्तांच्या मान्यतेसाठी गेलेली आहे. माती विक्रेत्यांच्या अग्रीम रक्कम मागणीसंदर्भातील निर्णय लेखा विभागाच्या विचाराअंती घेतला जाणार आहे. या सगळ्यावर निर्णय होऊन या आठवडाअखेर माती खरेदी करून ती मूर्तिकारांना वितरित केली जाण्याची अपेक्षा आहे.
-अजीत मुठे, उपायुक्त, पर्यावरण विभाग, वसई-विरार महापालिका
***