प्रतिनिधी | विरार : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आरक्षणाची अनुपलब्धता आणि खासगी ट्रव्हल्सकडून ऐन वेळी तिकीट दरांत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत कोकणवासीयांनी आतापासूनच खासगी गाड्यांची बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. याचे परिणाम म्हणून मागील आठवड्यांपासून विरार-मनवेलपाड्यातील खासगी ट्रॅव्हल्स कार्यालयांसमोर दूरवर रांगा लागलेल्या निदर्शनास येत आहेत. यातील बहुतांश चाकरमानी तिकिटासाठी रात्रीपासूनच रांगेत उभे राहत आहेत. सध्या दापोली-मंडणगड व रत्नागिरीपर्यंतचा दर 700 ते 800 रुपये इतका आहे. तर त्यापुढे म्हणजेच सिंधदुर्ग-सावंतवाडी आणि देवगडपर्यंत जायचे झाल्यास 1200 रुपयांपर्यंत दर आकारला जात आहे. ऐन गणेशोत्सव काळात हा दर अनुक्रमे 1000 हजार ते 1500 किंबहुना त्याहूनही अधिक वाढण्याची शक्यता चाकरमान्यांनी व्यक्त केली आहे.
वसई, विरार ते डहाणूपर्यंतच्या उपनगरातील चाकरमानी एप्रिल-मेची सुट्टी व होळी, महाशिवरात्री आणि गणेशोत्सव काळात विरारहून कोकण तसेच उर्वरित महाराष्ट्रात खासगी ट्रॅव्हल बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. एसटीचा गोंधळी कारभार आणि नियोजित वाहतूक व्यवस्था नसल्याने एसटीने प्रवास करणे या चाकरमान्यांना शक्य होत नाही. त्याच वेळी रेल्वे गाड्यांचे बुकिंगही या काळात आधीच फुल्ल होत असल्याने रेल्वेने जाणेही त्यांना शक्य होत नाही. अशा वेळी गणेशोत्सव व इतर सणांवेळी विरार येथून सुटणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसचा पर्याय निवडावा लागतो.
उत्सवकाळात खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांत प्रचंड वाढ होत असते. अनेकदा त्यासाठी महागाई, वाढलेले डिझेल-पेट्रोल दर आणि रस्त्यांवर पडलेले खड्डे अशी कारणे खासगी ट्रॅव्हल्सकडून पुढे केली जात असतात. साहजिकच; ही वाढ टाळण्यासाठी चाकरमान्यांनी दीड महिना अगोदरच आगाऊ बुकिंगवर भर दिलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून विरार-मनवेलपाड्यात बुकिंगकरता गर्दी उसळल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर, 22, 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी विशेष एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती शहरातील लोकप्रतिनिधींकडून होत आहे. गणेेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. कोकणात गणपती घरी नेण्याची लोकांची आसक्ती व श्रद्धा लक्षात घेता एसटी महामंडळाने विशेष बसेसची योजना आखावी. ही सेवा सुरू झाल्यास वसईतील नागरिकांची मोठी गैरसोय टळेल, अशी भावना यामागे लोकप्रतिनिधींची आहे.