ठाणे | प्रतिनिधी :- बालपणा पासूनच इतिहासाच्या, समाज कारणाच्या गोष्टी ऐकत असताना डायरीतील पानांवर जग उलगडत गेले. जंगल, रहस्य, साहस आणि पुर्णविराम नसलेली कल्पनाशक्ती! ही कुणा मोठ्या लेखिकेची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अवघ्या ११ वर्षांच्या पणतीची. अमायरा चव्हाण हिची. अमायराने ‘द ट्रेल डायरीज’ या साहसकथेच्या माध्यमातून बालसाहित्य विश्वात पाऊल टाकले आहे.
यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मराठी भाषा विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पाऊले उचलली. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. यशवंतराव चव्हाण हे राजकारणासोबतच साहित्यविश्वातही समृद्ध असल्याचे दिसून येते. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. ते रसिक आणि साहित्यिकही होते. त्यांचे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ’या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातील १९१२ ते १९४६ पर्यंतचा कालखंड, सार्वजनिक आयुष्याचा आढावा घेतला आहे.
तसेच युगांतर, सह्याद्रीचे वारे, ऋणानुबंध ही त्यांची साहित्यसंपदा आहे. तसेच आजच्या काळात त्यांच्या पणती अमायराने लेखनाच्या वाटेवर पहिले पाऊल टाकल्याने ही परंपरा नव्या पिढीतून पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. तिने लिहलेल्या कादंबरीत साहस, कल्पनाशक्ती आणि लहानग्या मनाच्या विश्वाची सुरेख जोड पाहायला मिळते. अमायरा ही पिढ्यानपिढ्यांची वैचारिक श्रीमंती लाभलेल्या घरात वाढलेली आहे. बालवयातच तिने लेखनाच्या माध्यमातून स्वतःच्या कल्पना मूर्तरूप दिले आहे.
अमायरा ११ वर्षांची असून नवी मुंबईत वास्तव्यास आहे. तिला लहानपणापासून पुस्तकांप्रतीचा ओढा असल्याचे सांगण्यात येते. वाचनामुळे आपल्याला जगाचे भान मिळते, असे सांगणार्या यशवंतराव चव्हाण घराण्याच्या परंपरेत वाढलेल्या अमायराने ङ्गद ट्रेल डायरीजफ ही साहसकथा लिहून बालसाहित्याच्या विश्वात पदार्पण केले आहे.
५ जुलै रोजी मुंबईत प्रकाशन सोहळा
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे. या वेळी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार यांची उपस्थित असणार आहे.
मुंबईमहापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, चरित्रलेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि ख्यातनाम बालसाहित्यिक राजीव तांबे यांचाही या प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती असणार आहे.