वसई-विरारमध्ये ऑपरेशन लोटस? हितेंद्र ठाकुरांचा भाजपला इशारा, बविआचे नगरसेवक फुटणार?

0

 

वसई-विरारमध्ये ऑपरेशन लोटस? हितेंद्र ठाकुरांचा भाजपला इशारा, बविआचे नगरसेवक फुटणार?

विरार | प्रतिनिधी  : महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता वसई विरारमध्ये राजकीय संघर्षाला तोंड फुटलं आहे. इथं बहुजन विकास आघाडीने (बविआ) ७१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असतानाही, भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबवून नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेचा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या खास शैलीत खरपूस समाचार घेतला असून भाजपला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

वसई विरारमध्ये पार पडलेल्या ११५ जागांच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. इथं बहुजन विकास आघाडीला ७० जागा मिळाल्या असून काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. तर भाजपनं ४३ जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळालं असलं तरी, सोशल मीडियावर भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. भाजप बविआचे नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असून, काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

“राजकारणात काहीही होऊ शकते,” असे सूचक विधान भाजपच्या गोटातून केले जात असल्याने या चर्चेला उधाण आले आहे. भाजपच्या या संभाव्य हालचालींवर प्रतिक्रिया देताना हितेंद्र ठाकूर आक्रमक झाले. ते म्हणाले, “लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. आता असले धंदे करत बसलात, तर लोक तुमच्या तोंडात शेण घालतील. ही भाजपने सोडलेली निव्वळ पुडी आहे. माझा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही आणि फुटणार नाही याची मला खात्री आहे.”

केवळ राजकीय आरोपांना उत्तर न देता ठाकूर यांनी आगामी कामांचा रोडमॅपही स्पष्ट केला. “आम्ही अनधिकृत बांधकामांवर अंकुश आणू. पिण्याचे पाणी देताना ती इमारत अधिकृत आहे की अनधिकृत हे पाहणार नाही, सर्वांना पाणी देऊ.

तसेच पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी विशेष उपाययोजना करून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. भाजपच्या या कथित खेळीमुळे वसई-विरारच्या राजकारणात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech