‘पापणीच्या पंखाखाली काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर यांची अखेरची प्रस्तावना साहित्य चावडीचे ७५ वे पुष विडंबनमय
विरार | प्रतिनिधी : युवा कवयित्री श्रुती रसाळ यांच्या ‘पापणीच्या पंखाखाली’ या मुक्तछंदातील प्रेम कवितांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता जुने विवा कॉलेज सेमिनार हॉल, विरार (प.) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कविता संग्रहाला ज्येष्ठ लेखक व नाटककार स्व. गंगाराम गवाणकर यांनी आपली अखेरची प्रस्तावना दिली आहे, ज्यामुळे या संग्रहाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यंग स्टार ट्रस्ट विरारचे अध्यक्ष तथा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या ‘साहित्य चावडी’च्या ७५व्या पुष्पांतर्गत हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. गणेश नायडू (लोकशाही मराठी न्यूज चॅनेलचे संचालक), मा. श्री. प्रदीप विजया राधाकृष्ण कबरे (अभिनेता, लेखक, निर्माता, दिग्दर्शक) आणि मा. डॉ. गणेश चंदनशिवे (मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी विभाग प्रमुख) डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे सर , संघटक सचिव अजीव पाटील उपस्थित होते.
सुरूवातीला नाटककार स्व. गंगाराम गव्हाणकर यांना श्रद्धांजली वाहिली. नंतर शाहिर दत्ताराम म्हात्रे यांनी प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा शिल्पा पै परूळेकर यांनी सांभाळली तर चावडीच्या सरपंच प्राध्यापिका कविता पाटील यांनी कवितासंग्रहाच्या रसग्रहणात म्हटले की ‘पापणीच्या पंखाखाली’ या कवितासंग्रहातील कविता वाचताना वाचकांना आपले शाळेतले कॉलेजातले पहिले प्रेम आठवल्याशिवाय राहणार नाही.
अभिनेते प्रदीप कबरे यांनी संत काव्यापासून ते आजच्या काळापर्यंतच्या कवितांचा उलगडा केला तसेच पापणीच्या पंखाखाली या कवितासंग्रहातील काही कवितांचे गायन केले पापणीच्या पंखाखाली या कवितांना अर्थ आहे लय आहे ध्वनी आहे असे उदगार त्यांनी काढले आणि कवितांमधील जो ध्वनी आहे तो कवियत्रीच्या अंतर्मनाचा ध्वनी आहे असे गौरवास्पद भाष्य केले.
अत्यंत लहान वयात श्रुती रसाळ या कवयित्रीने साहित्याच्या विश्वात यशस्वी पदार्पण केल्यामुळे डॉक्टर गणेश चंदनशिवे यांनी कवयित्रीचे विशेष कौतुक केले आणि कवितांमध्ये लावणी पोवाडा यांची झलक त्यांना जाणवली. कवयित्री श्रुती रसाळ यांच्या उत्कट आणि भावस्पर्शी कवितांचा हा संग्रह साहित्य विश्वात वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
दुसऱ्या सत्रात विडंबन काव्य संध्या सुरू झाल्यावर हसून पुरे वाट झाली हुंडाबळी दिवस तुझे हे फुलायचे, मंगलाष्टक अशा विविध विडंबन काव्य सादर झाली. कार्यक्रमाचे समन्वयन नगरसेविका सुरेखा कुरकुरे आणि संघटन संचालक अजीव पाटील यांनी केले.प्रस्तावना विक्रांत केसरकर यांनी केली तर आभार मधुकर तराळे यांनी मानले. सुरेखा कुरकुरे दिपाली जाधव, स्मरणा शेटे, श्रव्या मिश्रा तराळे, केसरकर कुमुद शहाकार यांनी मेहनत घेतली.
या सोहळ्याला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.