अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि.28(जिमाका):–  कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे तसेच मनुष्य व पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्याने दक्ष राहण्याचे निर्देश दिले.


यावेळी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पालघर जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी या महानगरपालिकांचे आयुक्त दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर,भिवंडी, मीरा भाईंदर, वसई – विरार या महानगरपालिकांच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाची माहिती घेतली. यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असला तरी सरासरी ८० ते १०० मिमी पाऊस पडल्याने सर्वांनी सांगितले. ठाणे, पालघर, रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बदलापूर मध्ये काल एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना वगळता कुठेही जीवितहानी अथवा पशुधन हानी झाल्याची घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले.

पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही रात्रीपर्यंत रेड अलर्ट दिला असल्याने प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.
ते पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरून लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अशा जागा आधीच हेरून लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सारी सज्जता करावी, त्यासाठी पालिकांच्या शाळेतील वर्ग तसेच जेवण आणि पाण्याची सोय करावी. सर्वच आपत्कालीन यंत्रणांनी अलर्ट राहून आपले फोन २४ × ७ चालू ठेवावेत, कोणाचेही फोन आल्यास त्यांना उत्तर द्यावे.

वीज महामंडळाबाबत फोन न घेण्याच्या तक्रारी येत असल्याने त्यांनी या सूचनेचे पालन कटाक्षाने करावे, असे सांगितले. तसेच आपत्कालीन सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ऑन फील्ड सज्ज राहावे.

ठाणे, भिवंडी, उल्हासनगर मनपा हद्दीतील धोकादायक इमारतींकडे विशेष लक्ष द्यावे, एखादी इमारत खचल्याची घटना निदर्शनास आल्यास ती इमारत तात्काळ रिकामी करावी, असे निर्देश श्री.शिंदे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच धरणांच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष मनुष्यबळ तैनात करावे, असेही सांगितले. मुंबई, ठाणे, भिवंडी आणि महामार्गावर ट्रॅफिक जॅम होऊन लोकांना तासन् तास लागू नयेत, यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे असे सांगून ते पुढे म्हणाले की, रायगड भागातील पावसाचा अंदाज घेऊन कुठे दरड कोसळण्याची शक्यता वाटल्यास ते गाव तातडीने रिकामे करून लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे.

मुंबई आणि कोकणातील चार जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती आटोक्यात असली, तरीही पावसाचा जोर वाढला, किंवा कमी वेळात जास्त पाऊस पडला तरी त्या त्या महानगरपालिकांच्या हद्दीतील परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.


मराठवाड्यातील परिस्थितीचाही घेतला आढावा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अहिल्यानगर येथे पावसाचा जोर कायम असून तिथेही पूर आला आहे.आज सकाळी आपण तेथील जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांशी बोलून तेथील परिस्थिती जाणून घेतली, तसेच नदी जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांच्या जेवणाची आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्देश स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रसंगी काही अटी शर्ती बाजूला ठेवून त्यांना मदत करावी लागेल. राज्य शासनाकडून ही मदत लवकरच त्यांना देण्यात येईल, ही वेळ शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आहे आणि ते काम आम्ही नक्की करू, असेही ते शेवटी म्हणाले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech