“माचाळच्या अतिदुर्गम शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे वाटप आणि कवितांचा जागर!”
लांजा तालुक्यातील अतिदुर्गम अशा माचाळ गावातील पूर्ण प्राथमिक शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या ‘आभाळाचे घर’, ‘धमाल गंमत’ आणि ‘शब्दांचे फटाके’ या बालकविता व बालकथासंग्रहाचे आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या ग्रंथालयाला ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल पट्टेबहादूर, शिक्षक सचिन नागरगोजे, माजी मंडळ अधिकारी सुरेश गांधी, कोकणस्थ उत्क्रांती फाउंडेशनचे कार्यकर्ते रवींद्र ठाकर, सौ. स्मिता लोटणकर तसेच ग्रामस्थ, वयोवृद्ध मंडळी आणि बालवाडीतील मुले उपस्थित होती. पाहुण्यांनी आपले मौलिक विचार मांडून मुलांना वाचनाची आवड, चिंतन आणि संस्कृतीचे जतन करण्याची प्रेरणा दिली.
अशोक लोटणकरांची “पावसातली” गाणी,
मुलांनी म्हणून दाखवली. सुरेश गांधी -रवींद्र बुधाजी ठाकर यांनी शाळेला लागणाऱ्या मदतीविषयी सहकार्य करू, असे आश्वासन दिले. कवी अशोक लोटणकर यांची एकवीस पुस्तके प्रकाशित झाली असून ते ‘डेपो मॅनेजर’ या पदावरून निवृत्त झालेले आहेत. ते मूळचे साखरप्याचे असून ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नागरगोजे सरांनी सुंदर शैलीत केले आणि सर्वांचे आभारही मानले.