राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळूनही चवदार तळे दुर्लक्षितच! पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी चिखलगाळ चवदार पाण्यावर चढला हिरव्या शेवाळाचा थर

0

राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळूनही चवदार तळे दुर्लक्षितच!
पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी चिखलगाळ
चवदार पाण्यावर चढला हिरव्या शेवाळाचा थर

महाड| नीलेश पवार :  भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा लढा उभारण्यासाठी ज्या महाड चवदार तळ्याची निवड केली ते महाड नगरपालिकेच्या अखत्यारितील चवदार तळे सध्या प्रचंड दुरवस्थेच्या गर्तेत अडकले आहे. चवदार तळ्याचे पाणी पावसाळ्यात आलेल्या शेवाळामुळे हिरवेगार झाले आहे. तसेच तळ्याचा परिसरही प्रचंड अस्वच्छ झाला आहे.


राज्य शासनाकडून चवदार तळ्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. त्या राष्ट्रीय स्मारकाकडे मात्र शासनाचे व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक वर्षांपूर्वी या चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण झाले होते. या सौंदर्यीकरणानंतर मात्र दरवर्षी केवळ लाखो रुपये खर्च केल्याचे दाखवले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतेच ठोस काम या ठिकाणी झालेले नाही. दरवर्षी २० मार्च रोजी चवदार तळे क्रांतीदिनाच्या स्मृती जागवण्यासाठी राज्य व देशभरातून असंख्य आंबेडकरी अनुयायी आणि बहुजन समाज चवदार तळे परिसरात येतात त्यावेळी चवदार तळे आणि डॉ. आंबेडकर स्मारकाची दुरवस्था पाहून व्यथित होतात.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पाहण्यासाठी जगभरातूनही अनेक पर्यटक दरवर्षी महाडमध्ये येत असतात. मात्र, आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची दुर्दशा पाहून ते देखील नाराजी प्रकट करतात.

…………………….
चवदार तळे परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे या सभागृहाचा संपूर्ण परिसर सध्या चिखलगाळात रुतल्याप्रमाणे झाला आहे. मागील बाजूला असलेली संरक्षक भिंतही गेल्या अनेक वर्षांपासून पडीक अवस्थेत आहे. झाडांच्या शेजारी लावलेल्या पदपथावरील लाद्या उखडल्या आहेत. तेथे तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिकचे शौचालय बसवण्यात आले आहेत मात्र त्या ठिकाणी जाताना चिखलातून वाट काढावी लागत आहे.

सभागृहाच्या समोरील बाजूस असलेले लॉन पावसाच्या तुंबणार्‍या पाण्यामुळे खराब झाले आहे. या परिसरात पावसाचे पाणी तुंबत असल्याने चिखल आणि पदापथावर शेवाळ तयार झाले आहे. चवदार तळ्यावर जाणार्‍या मुख्यद्वाराच्या बाजूला असलेले गटारही भरले आहे. तळ्याच्या संपूर्ण संरक्षक भिंतीवर रोपटी उगवली आहेत. संरक्षक भिंतीच्या पदपथाच्या शेजारी वाहने उभी करू नये असा फलक असला तरी या ठिकाणी वाहने उभी केली जात आहेत.

पोलिस आणि नगरपालिका प्रशासन या वाहनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात. फलक लावून देखील जे वाहन चालक वाहने उभी करतात त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. तळ्यात असलेले कारंजेही बंद अवस्थेत आहेत.
…………………
चवदार तळ्याच्या पाण्यावर पावसाळ्यानंतर शेवाळ येते. चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिनण् डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मनुस्मृती दहन दिवस अशा अनेक कार्यक्रमांप्रसंगी येणारे भीमानुयायी चवदार तळ्यातील पाणी प्राशन करतात. आंतरिक भावनेतून हे पाणीही सोबत घेऊन जातात. त्यामुळे पाण्यात येणार्‍या शेवाळावर गेल्या अनेक वर्षांपासून विविध एजन्सीज नेमून काम केले जात आहे.

यावर लाखो रुपये खर्च करण्यात आलेला आहे मात्र तरी देखील शेवाळ्याची समस्या दूर होताना दिसत नाही. विविध कार्यक्रमांच्या वेळी थातूरमातूर कामे करून पैसा वाया घालवला जात आहे. चवदार तळ्याचे नाव जागतिक पटलावर नोंद झाली असली तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र त्या पद्धतीने देखभाल केली जात नसल्याने भीम अनुयायांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

दर्जा राष्ट्रीय स्मारकाचा-परिसरातील बांधकामे मात्र नियमबाह्य
राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त झालेले स्थळ अथवा इमारत ज्या ठिकाणी असते त्या परिसरामध्ये बांधकाम करण्यास मंजुरी देताना वेगळे नियम आणि निकष लागू आहेत. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या संपूर्ण परिसरात बांधकाम करताना नियमावलीला फाटा दिला जात आहे. त्यामुळे चवदार तळ्याचा संपूर्ण परिसर भिमानुयायांना पदपथावरून फिरून पाहता येत नाही. या ठिकाणी बांधण्यात येणार्‍या बांधकामांचे सांडपाणी कुठे जाते याचाही विचार होणे आवश्यक आहे.

परिसरामध्ये बांधकामे होत असताना त्यांना पार्किंग नसल्याने या इमारतीमधील रहिवाशांची वाहने चवदार तळ्याच्या परिसरामध्ये पार्क केली जात आहेत. यामुळे चवदार तळ्याला भेट देणार्‍या पर्यटकांची वाहने मात्र बाहेर लावावी लागत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या अभियंत्यांची या बांधकाम मंजुरीबाबत असलेली भूमिका दुटप्पी असल्याचे दिसून येत आहे.

चवदार तळे परिसरात विविध विकासकामांसाठी जवळपास ६५ कोटींचा निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर होताच कामे पूर्ण होतील.
धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी, महाड नगर परिषद

चवदार तळे त्याचप्रमाणे क्रांतिस्तंभ आणि परिसर विकासकामांचा प्रस्ताव आम्ही समाज कल्याण विभागाकडे दिला आहे. त्यानुसार लवकरच बैठक होऊन या प्रस्तावावर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे
– प्रकाश मोरे, कोकण रिपब्लिकन संस्था

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech