पर्यावरणासाठी एकत्र आले हात – कोकण संस्थेची बीच क्लिनिंग मोहिम गाजली

0

■पर्यावरणासाठी एकत्र आले हात – कोकण संस्थेची बीच क्लिनिंग मोहिम गाजली

मुंबई | प्रतिनिधी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने दादर पश्चिम, शिवाजी पार्क येथे बीच क्लिनिंग ड्राईव्ह २०२५ चे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवानंतर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मूर्ती, सजावटीचे साहित्य, फुलांचा कचरा व प्लास्टिक साचते. या कचऱ्यामुळे सागरी जीवसृष्टीला धोका निर्माण होतो आणि समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यही नष्ट होते.

या पार्श्वभूमीवर आयोजित मोहिमेत संस्थेच्या ११६ स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. उपक्रमादरम्यान एकूण ३२६ किलो कचरा हटवण्यात आला. यात १३० किलो मूर्ती, ५१ किलो फुलांचा कचरा, १२२ किलो लाकूड आणि २३ किलो प्लास्टिक यांचा समावेश होता.

संस्थेचे स्वयंसेवक व नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. संस्थेचे संस्थापक श्री. दयानंद कुबल यांनी सांगितले की, “बीच क्लिनिंग ड्राईव्ह हा फक्त कचरा उचलण्याचा कार्यक्रम नसून, लोकांमध्ये जबाबदार विसर्जनाची जाणीव निर्माण करण्यासाठी एक पाऊल आहे. स्वच्छ समुद्रकिनारे आणि निरोगी पर्यावरण हीच आपली खरी गणेशभक्ती आहे.”

या मोहिमेमुळे केवळ समुद्रकिनारा स्वच्छ झाला नाही, तर नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबतही महत्त्वपूर्ण जनजागृती घडवून आणली.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech