मी पुन्हा येणार, घासून नाही; तर ठासून येणार! हितेंद्र ठाकूर यांचा सूचक इशारा

0

मी पुन्हा येणार, घासून नाही; तर ठासून येणार! हितेंद्र ठाकूर यांचा सूचक इशार राज पाटील आयोजित जनसेवा मित्र मंडळ दहीहंडी उत्सवातील भावनिक क्षणांची जोरदार चर्चा

विरार | संजय राणे  : मी पुन्हा येणार, घासून नाही; तर ठासून येणार, या आशयाचा बॅनर बालगोविंदाने सातव्या थरावरून झळकवला आणि एकच जल्लोष वातावरणात झाला. उपस्थित गोविंदा आणि आप्पाप्रेमी प्रेक्षक हम चित्रपटातील अरे ओ जानेमन, बाहर निकल, जुम्मे का वादा है….च्या गाण्यावर जोरदार थिरकले. त्या माध्यमातून त्यांनी बहुजन विकास आघाडी आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रतिच्या आपुलकीच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. गोविंदांच्या या उत्स्फूर्त क्रियेला लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनीही तितक्याच समर्थपणे हात उंचावत, व्हीची खूण करत धीरगंभीर स्मितमुद्रेत प्रतिक्रिया दिली. आणि पुन्हा एकदा पावसाच्या मुसळधारेत ऊर्जाभरल्या गोविंदांचा जोष आसमंताला भिडला….वसई-विरारमध्ये सध्या या भावनिक क्षणांची जोरदार चर्चा आहे.

 

विरार येथील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने काल (16 ऑगस्ट) दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवाला लोकनेते हितेंद्र ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्सवाचे आयोजक राज वसंत पाटील यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत अनेक गोविंदांनी शिस्तबद्ध रचना करत सलामी दिली. हितेंद्र ठाकूर यांनी हा थरार अनुवला व गोविंदांच्या मेहनतीला उत्स्फूर्त दाद दिली. यशस्वी सलामी देणाऱ्या गोविंदांचा हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान; विरार येथील साईबा गोविंदा पथकाने लक्षवेधी संदेश देण्याचा निर्णय घेतला. उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवत बालगोविंदा सातव्या थरावर पाय रोवून उभा राहिला आणि आभाळउंचीवरून आप्पाप्रेमींचा संदेश संपूर्ण वसई-विरारला दिला. मी पुन्हा येणार, घासून नाही; तर ठासून येणार,चा संदेश निविदिकेने वाचला आणि समस्त आप्पाप्रेमींनी जयघोष केला. डिजेचाही आवाज चिरत त्याची गुंज आसमंताला भिडली. या रोमांचकारी; पण भावनिक सादेने सर्वांचाच कंठ दाटून आला. हितेंद्र ठाकूर यांच्या चेहऱ्यावर सर्वांच्या नजरा स्थिरावल्या. त्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षा करू लागल्या. त्या वेळच्या त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या खोलवर गूढ स्मिताने अनेक प्रश्न अनिर्णित ठेवले. हितेंद्र ठाकूर यांनी त्याच धीरगंभीर स्मितमुद्रेत हळूवार हात उंचावला. व्हीची खूण करत सूचक इशारा केला. त्याच वेळी बाहेरच्या पावसाचाही जोर वाढला. त्याच्या संततधारेने हितेंद्र ठाकूर यांच्या मनातील जखम ओली केली…. आणि उपस्थितांच्या हृदयात ओलावा निर्माण झाला….!

 

आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साईबा गोविंदा पथकाने समस्त वसई-विरारची जनता आणि बहुजन विकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हितेंद्र ठाकूर यांना अपेक्षित हाक दिलेली आहे. कळजाला हात घालणारी ही साद जनभावना मानली जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना अनपेक्षित पराभवला सामोरे जावे लागलेले होते. या पराभवातून बहुजन विकास आघाडी अद्याप सावरलेली नाही. पराभवापेक्षा पक्षांतर्गत मतभेदांतून झालेल्या जखमा खोलवर आहेत. पक्षांतर्गत संभ्रमावस्था अद्याप कमी झालेली नाही. किंबहुना; त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बहुजन विकास आघाडीतील प्रमुख नेते दोन धुव्रांवर आहेत. त्यातून पक्षात अनेक जण पक्षांतराच्या मार्गावर आहेत. साहजिकच; सर्वसामान्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत. पक्षाची भूमिका त्यांना कळेनाशी झालेली आहे.

 

या सगळ्या पार्श्वभूमीवर राज वसंत पाटील आयोजित जनसेवा मित्र मंडळ दहीहंडी उत्सवातून आप्पाप्रेमी नागरिक व गोविंदांनी जनकौल दिलेला आहे. मात्र हितेंद्र ठाकूर हा कौल स्वीकारतात का?, हा जनकौल देवकौल मानतात का? किंबहुना; पक्षांतर्गत दरी सांधून विरोधकांशी ते समर्थ सामना करतील का? स्वत:सोबतच बहुजन विकास आघाडीला सावरतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे समस्त वसई-विरारकर आणि बहुजन विकास आघाडीतील कार्यकर्त्यांना हितेंद्र ठाकूर यांच्याकडून स्पष्टपणे हवी आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech