महापालिकेच्या शहर सुशोभीकरणाला घाणीचे ग्रहण कोट्यावधी रुपयांची शिल्पे देखभालीअभावी काळवंडली

0

वसई |  प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिकेचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशा स्वरूपाचा बनला आहे. वसई विरार महापालिकेने कोट्यावधी रुपयांचा खर्च करून शहर सुशोभीकरणासाठी जो उपक्रम हाती घेतला होता; तो उपक्रमच आता घाणीच्या विळख्यात सापडला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले शिल्पे कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने शहर सुशोभीकरणाचे अक्षरशः तीन तेरा वाजले असल्याचे प्रभावी चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्यानंतर त्यांच्याशी संबंधित अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी शहर सुशोभीकरणाच्या कामातही मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

त्यामुळेच शहराच्या मुख्य चौकात महत्त्वाच्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली शिल्पे घाणीच्या विळख्यात सापडली आहेत. ज्या ठिकाणी शिल्पे उभारण्यात आली आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून त्याची कोणत्याही स्वरूपाची देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहर सुशोभीकरणाला लागलेले गालबोट हे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या भ्रष्टाचाराने लागले असल्याचा आरोप दरम्यान होऊ लागला आहे. बाहेरील शहरातून येणारे अधिकारी वसई विरार महापालिकेत स्थानापन्न होतात. परंतु त्यांना या शहराशी ममत्व नसल्याने ते येथून मोठ्या प्रमाणात आर्थिक बिदागी घेण्यातच धान्यता मानतात. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गैरकारभाराची मालिका सुरू असून त्यात अनधिकृत बांधकामांतून होणाऱ्या वसुल्या केंद्रबिंदू ठरली आहे.

त्याचेच परिणाम ईडीच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचे नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी व आता माजी आयुक्त अनिल कुमारपवार यांच्यावर केलेल्या कारवाईतून दिसून आले आहेत. शहर सुशोभीकरणासाठी आयुक्तांच्या काळात जे जे ठेके दिले गेले व त्यासाठी नेमलेले ठेकेदार कोणते होते? कोणत्या शहरातील होते? त्यांचा आयुक्तांशी काही कनेक्शन होते का?

तसेच शिल्प उभारण्यासाठी जो कोट्यावधी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे, त्यात काही गैरकारभार झाला आहे का? याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी देखील कसून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी दरम्यान होऊ लागली आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech