प्रतिनिधी | विरार : फार्महाऊस येथे अवैध वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपीस अटक करून पीडित महिलेची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा यांना यश आले आहे. 16 जुलै रोजी अनैतिक मानवी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना या संदर्भात माहिती प्राप्त झाली होती. सुनील मनोज परेड (33) हा व्यक्ती मोबाईलवरून गिऱ्हाईकांशी संपर्क करून वेश्यागमनासाठी मुली पुरवितो, अशी गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींची पूर्तता करत बोगस गिऱ्हाईक व दोन पंचांसमक्ष वसई-कळंब बिचवरील समर फार्महाऊसच्या एका रूमवर सतत्या पडताळणीसाठी सायंकाळच्या सुमारास छापा टाकण्यात आला होता.
त्या वेळी मुली पुरविण्याच्या तयारीत असलेल्या सुनील मनोज परेड याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गु.रजि.नं. 116/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143(2) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
***